Onion Farmers Protest: आखाती देशांमधील युद्ध आणि केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या पूर्णपणे कोलमडला आहे. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीने (MVA) आक्रमक पाऊल उचलले आहे. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे ‘शेतकरी क्रांती महामोर्चा’ काढण्यात आला. मात्र, या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये तीव्र झटापट झाली असून, पोलिसांनी आमदार रोहित पवारांसह मविआच्या अनेक दिग्गज नेत्यांना ताब्यात घेतले आहे.
रस्ता रोकोमुळे महामार्गावर तणाव; पोलिसांकडून मविआ नेत्यांची धरपकड
कांदा दरवाढीवरून सुरू झालेला हा महामोर्चा काहीच वेळात प्रचंड चिघळला. संतप्त शेतकरी आणि मविआ कार्यकर्त्यांनी महामार्गावर जोरदार घोषणाबाजी करत ‘रस्ता रोको’ आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान काही जणांनी वाहनांची हवा सोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला असून, यामुळे घटनास्थळी कमालीची तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांची धरपकड सुरू केली. यामध्ये आमदार रोहित पवार, आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादी (श.प.) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या मोर्चामध्ये खासदार शोभाताई बच्छाव, खासदार भगरे गुरुजी यांच्यासह मविआचे शेकडो पदाधिकारी आणि हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.
हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न – रोहित पवारांचा ‘X’वरून कडक प्रहार
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) अकाऊंटवरून राज्य सरकारवर तीव्र शब्दांत तोफ डागली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करण्याऐजी जर आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि शेतकऱ्यांना अटक केली जात असेल, तर हा थेट लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच, या सरकारच्या राजवटीत अन्नदात्याने स्वतःचा हक्क मागणं हा गुन्हा ठरला आहे का, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी जर आंदोलकांना अटक केली जात असेल, तर हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. आज पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचे काम सरकारने केले. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा झालाय का?
आम्हाला आज अटक करून हा… pic.twitter.com/NF0MCE6cM4
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 26, 2026
शेतकरी एकजुटीचा मुंबई-दिल्लीला धसका; उद्या केंद्रीय मंत्र्यांसोबत तातडीची बैठक
अटकेनंतरही रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या विराट एकजुटीचा विजय झाल्याचा दावा केला. ते म्हणाले की, आम्हाला अटक करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. गत 18 तारखेच्या आंदोलनानंतर सरकारने केवळ 3 रुपये वाढवले होते, मात्र आजच्या विराट आंदोलनाचा धसका मुंबईपासून दिल्लीपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. याच आंदोलनाचा परिणाम म्हणून उद्या दिल्लीत केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री आणि पणन मंत्र्यांची तातडीची बैठक होणार आहे.
तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा मविआचा अंतिम इशारा
कांदा उत्पादकांच्या हक्काची ही लढाई इथेच थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा मविआ नेत्यांनी दिला आहे. उद्या दिल्लीत होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने हमीभावाचा ठोस निर्णय झाला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करतील. पुढील टप्प्यातील हा एल्गार सहन करणे सद्य सत्ताधाऱ्यांना चांगलंच महागात पडेल, असा थेट इशारा रोहित पवार आणि मविआ नेत्यांनी प्रशासनाला दिला आहे.


