Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कश्यपी धरणात परिसरात घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी धरण परिसरात गेलेल्या एका कुटुंबावर काळाने झडप घालत गरोदर महिलेसह चौघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सचिन ठोंबरे आणि रोहिणी ठोंबरे या पती-पत्नीचा समावेश आहे. रोहिणी ठोंबरे या गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. मृत दोन लहान मुले ही ठोंबरे कुटुंबाच्या शेजारी राहणारी होती. सर्वजण मखमलाबाद नाका परिसरातील रहिवासी होते.
सुट्टीचा दिवस साजरा करण्यासाठी हे कुटुंब कश्यपी धरण परिसरात गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला, पण पाण्याची खोली अधिक असल्यामुळे सुरुवातीला त्यांना यश आले नाही.
दरम्यान, परिसरात उपस्थित असलेल्या एका धाडसी महिलेने ठोंबरे दाम्पत्याची दोन वर्षांची मुलगी पाण्याकडे जात असल्याचे पाहताच तत्काळ तिला उचलून सुरक्षितस्थळी नेले. त्यामुळे चिमुकलीचा जीव वाचला.
यानंतर स्थानिक तरुणांनी धाडस दाखवत पाण्यात उड्या घेत शोधमोहीम सुरू केली. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.
या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने पर्यटकांना धरण परिसरात आणि खोल पाण्याजवळ जाताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यावश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


