Beed Crime: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सावत्र आई आणि तरुण मुलामधील कथित प्रेमसंबंधांचा शेवट दुहेरी मृत्यूत झाल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे. बदनामीच्या भीतीतून तरुणाने विष प्राशन केल्याची माहिती समोर आली असून, त्याच्या मृत्यूनंतर संबंधित महिलेनेही आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
केज तालुक्यातील सोनी जवळा गावातील एका व्यक्तीने पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर चार वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते. दरम्यान, पहिल्या पत्नीपासून असलेल्या २१ वर्षीय मुलाचे आपल्या सावत्र आईसोबत जवळीक वाढल्याची माहिती समोर आली. हे संबंध कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर काही दिवसांपूर्वी दोघेही घर सोडून तेलंगणात गेल्याचे सांगितले जाते.
पत्नी आणि मुलगा दोघेही बेपत्ता झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवत तेलंगणातून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, आपले संबंध उघड झाल्यामुळे मानसिक तणावात असलेल्या तरुणाने विषारी औषध सेवन केल्याचे समोर आले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर संबंधित महिलेलाही मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर रुग्णालय परिसरातील झाडाला गळफास घेऊन तिनेही जीवन संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दुहेरी मृत्यूमुळे अंबाजोगाई आणि केज परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, उल्हासनगरमधील गोळीबार आणि दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांची कारवाई वेगाने सुरू असून आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


