Solapur News: पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचे राज्य सोडून महाराष्ट्रात आलेल्या दोन परप्रांतीय कामगारांचा सोलापुरात अत्यंत दुर्दैवी अंत झाला आहे. कडक उन्हाळ्यामुळे कुलरमध्ये पाणी भरत असताना लागलेल्या विजेच्या धक्क्याने एका मजुराचा जीव गेला, तर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या जिवाभावाच्या मित्रानेही आपले प्राण गमावले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
कामगार वसाहतीत घडली घटना
संतोष भुवनेश्वर पासवान (वय ४०, रा. झारखंड) आणि सुनील कुमाररंजन यादव (वय ३४, रा. जहानाबाद, बिहार) अशी मृत पावलेल्या दोन कामगारांची नावे आहेत. हे दोघेही कुंभारी येथील ‘लक्ष्मी स्पिनर्स’ या सूतगिरणीत मजूर म्हणून काम करत होते आणि कंपनीच्याच कामगार वसाहतीमधील (लेबर कॉलनी) खोलीत एकत्र राहत होते.
वाचवण्याच्या नादात मित्रालाही गाठले मरण
शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास प्रचंड उकाडा असल्याने खोलीतील कुलर सुरू होता. सुनील यादव हा धावत्या कुलरमध्ये पाणी भरण्यासाठी गेला असता, लोखंडी बॉडीमध्ये अचानक वीजप्रवाह (करंट) उतरल्याने त्याला जोरदार शॉक लागला आणि तो कुलरलाच चिटकून राहिला. सुनीलला तडफडताना पाहून शेजारीच असलेला संतोष पासवान त्याला वाचवण्यासाठी मागे-पुढे न विचार करता धावला. मात्र, सुनीलला बाजूला ओढण्याच्या नादात संतोषलाही विजेचा तीव्र झटका बसला. वीजप्रवाह इतका भीषण होता की, या अपघातात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला.
शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन; पोलिसात नोंद
या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे हवालदार ए. ए. शेख यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही तात्काळ शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. वळसंग पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून, अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. पोटासाठी मैलोनमैल दूर आलेल्या या दोन मित्रांच्या अशा एकत्र जाण्याने कारखान्यातील इतर कामगारांमध्ये कमालीची शांतता पसरली आहे.


