Ravi Naik Passes Away : गोव्याचे दोनवेळा मुख्यमंत्री आणि सध्या कृषिमंत्री असलेले वयोवृद्ध राजकारणी रवी सीताराम नाईक यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मंगळवारी रात्री फोंडा येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने गोव्याच्या राजकीय परंपरेत मोठी पोकळी निर्माण झाली असून, संपूर्ण राज्यात शोकाची लहर उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज (१५ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजता खडपाबांध येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. निधनाच्या बातमीने फोंडा येथील निवासस्थानी चाहत्यांची, हितचिंतकांची आणि राजकीय नेत्यांची मोठी गर्दी झाली आहे. ‘धडाडीचा नेता हरपला, बहुजनांचा कैबारी गेला’ अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रवी नाईक यांच्या पश्चात पत्नी पुष्पा, दोन मुले रितेश (नगरसेवक) आणि रॉय, स्नुषा व तीन नातवंडे असा परिवार आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते मंगळवारी फोंडा नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावू शकले नव्हते. सायंकाळनंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. निकटवर्तीयांच्या माहितीनुसार, ते घरी असताना हृदयविकाराचा झटका आला होता.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शोक व्यक्त करताना म्हटले, “मंत्री रवी नाईक यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वात प्रशासकीय स्थैर्य, ग्रामीण विकास आणि जनकल्याणाच्या योजना राबवल्या गेल्या. शांत स्वभाव, साधेपणा आणि प्रचंड जनसंपर्क यामुळे ते सदैव आदरस्थानी राहिले. गोवा राज्यासाठीचे त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे.”
पंतप्रधान मोदींनीही ट्विटरवर (एक्स) शोक व्यक्त करताना नाईक यांना “अनुभवी प्रशासक आणि समर्पित लोकसेवक” म्हणून उल्लेख करून, “गोव्याच्या विकासात त्यांचे योगदान अमिट आहे. गरीब आणि उपेक्षितांना सक्षम करण्यासाठी ते नेहमी उत्साही होते” असे म्हटले आहे. गोवा सरकारने तीन दिवसांचा राज्यशोक जाहीर केला आहे.
राजकीय कारकीर्द थोडक्यात
रवी नाईक यांनी जवळपास ५० वर्षे गोव्याच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावली. १९७६ मध्ये फोंडा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी राजकारणात पदार्पण केले. १९८४ मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर फोंडा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते सात वेळा आमदार झाले. १९९८ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
त्यांनी विविध पक्षांतून काम केले. २००० मध्ये मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकांआधी काँग्रेस सोडून भाजपमध्ये परत आले. ते विरोधी पक्षनेते, सभापती आणि विविध खात्यांचे मंत्रीही राहिले. २५ जानेवारी १९९१ ते मे १९९३ आणि २ ते ८ एप्रिल १९९४ अशा दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले.
त्यांच्या काळात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या. तसेच, कुल आणि मुंडकारांच्या हक्कांसाठी चळवळ चालवली आणि गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याची कल्पना मांडणारे ते पहिले आमदार होते. भंडारी समाजातील नेते म्हणून त्यांचा मोठा प्रभाव होता.


