पुणे: अकरावीसाठी सुरू झालेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी गेल्या दोन दिवसांत राज्यातील ९ हजार ३४६ महाविद्यालयांत एकूण ४ लाख ५७ हजार ४९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. यापूर्वी २१ तारखेला तांत्रिक अडचणीमुळे या प्रवेश प्रक्रियेत खंड पडला होता.
अकरावीच्या २० लाख ९२ हजार जागांसाठी ही नोंदणी होत आहे. राज्यातील ९ हजार ३७३ कनिष्ठ महाविद्यालयांमधील नोंदणी करता येणार आहे. कॅप फेरीसाठी १८ लाख ७७ हजार ८३९ जागा आहेत. पहिल्या दिवशी झालेल्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अडचणी आल्या होत्या. मात्र मंगळवारी दुसऱ्या दिवशी ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू होती. विद्यार्थ्यांचे लॉगीन आयडी बनवणे, तसेच नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती, तसेच अकरावी प्रवेशासाठी आवश्यक प्रमुख कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू होती.
विद्यार्थ्यांनी ज्या शाळेतून दहावीची परीक्षा दिली, त्या शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका देण्याची कार्यवाही गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ही कागदपत्रे देण्यात आली आहेत. तर काही शाळांमध्ये बुधवारी दिली जाणार आहेत. ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. त्यानंतरच त्यांची प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक नोंदणी पूर्ण होणार आहे. तसेच काही विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (इंडब्ल्यूएस) प्रमाणपत्र उपलब्ध नाही. त्यांनी ही प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी महा ई-सेवा केंद्रामध्ये अर्ज दिलेले आहेत.


