यवतमाळ : रस्त्यात झोपून असलेल्या मद्यधुंद व्यक्तीला बाजूला हो असे म्हटल्याच्या कारणावरून झालेल्या वादात त्याने एका तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित व्यक्तीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. प्राणघातक हल्ल्याची ही घटना दारव्हा तालुक्यातील फुबगाव येथे २१ डिसेंबरला सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
अंकुश उद्धवराव देशमुख (२९, रा. फुबगाव) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे तर प्रकाश मंगू पवार (५०, रा. फुबगाव) असे त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २१ डिसेंबरला सायंकाळी आरोपी प्रकाश मद्यधुंद अवस्थेत फुबगाव येथील एका रस्त्याच्या मधोमध झोपून होता. यावेळी अंकुश त्या मार्गावरून जात होता. तेथून जाताना त्याला अडचण निर्माण झाली. त्यामुळे त्याने आरोपी प्रकाशला रस्त्याच्या बाजूला हो, असे म्हटले.
त्यावर त्याने अंकुशशी वाद घातला. एवढेच नव्हे, तर संतापाच्या भरात त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच ते धावून आले. त्यानंतर त्यांनी त्यांचा वाद सोडवून अंकुशला रुग्णालयात नेले. उपचारानंतर त्याने दारव्हा पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून आरोपी प्रकाशविरुद्ध भा.न्या.सं. ११८ (१), ३५२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


