Pune Crime: पुण्यातील बाणेर येथील एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या ३२ वर्षीय इंजिनिअरने लोणावळ्यातील प्रसिद्ध लायन्स पॉइंट येथे २५० फूट खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. वीरेंद्र सिन्हा असे या मृत अभियंत्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी वीरेंद्रने आपल्या पत्नीला आणि मित्रांना ईमेल पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, ज्यामुळे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
गाडीच्या चाव्या आणि शेवटचा ईमेल
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी लायन्स पॉइंटजवळ वीरेंद्रची कार बेवारस अवस्थेत आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्याने पत्नीला पाठवलेल्या मेसेजमध्ये “गाडीच्या चाव्या चाकाखाली ठेवल्या आहेत” असे नमूद केले होते. तो मूळचा बाणेर येथील रहिवासी असून एका नामांकित आयटी कंपनीत कामाला होता. त्याची कार घटनास्थळी सापडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले.
शिवदुर्ग टीमकडून मृतदेह बाहेर
घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिस आणि ‘शिवदुर्ग रेस्क्यू टीम’ने संयुक्त शोध मोहीम राबवली. सुमारे २५० फूट खोल दरीतील पाण्यातून वीरेंद्रचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असून, रेस्क्यू टीमच्या मदतीने पोलिसांनी तातडीने शोधकार्य पूर्ण केले.
कौटुंबिक कलह की कामाचा ताण? पोलीस तपासात गुंतले
वीरेंद्रच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी प्राथमिक तपासात त्याचे पत्नीशी भांडण झाले असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस सध्या त्याचे ईमेल, मोबाईल मेसेज आणि फोन कॉल्सची बारकाईने तपासणी करत आहेत. या टोकाच्या पाऊला मागे कौटुंबिक वाद होता की कामाचा ताण, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी, पोलिसांचा तपास सुरू आहे.


