Weather Alert : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पसरलेली गुलाबी थंडी आता पुन्हा मागे सरकताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून, सकाळची हुडहुडी आणि पहाटेचा गारवा कमी झाला आहे. दुपारी मात्र उन्हाचा कडाका कायम आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३-४ दिवस किमान तापमानात ही वाढ कायम राहील. त्यानंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा जाणवत असला तरी बहुतांश ठिकाणी किमान तापमान १० अंशांच्या वर गेले आहे. निफाड येथे राज्यातील नीचांकी ८.६ अंश, धुळे ८.७ अंश तर भंडारा येथे १० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, बीड, अहिल्यानगर, पालघर आणि माथेरान या भागांत अद्याप कडाक्याची थंडी जाणवत आहे.
दुसरीकडे कोकणात मात्र उकाडा वाढला आहे. रत्नागिरी येथे गुरुवारी कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सकाळी धुके आणि थंडी, दुपारी मात्र उकाडा असा हवामानाचा सतत बदलता मूड नागरिकांना हैराण करत आहे. पुढचे काही दिवस थंडी काहीशी मवाळ राहील, पण खरी कडाका थंडी परतण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.


