NCP Sunetra Pawar Letter : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आता नवं वळण मिळालं आहे. सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पक्षातच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
या पत्रात २८ जानेवारी ते १० मार्च दरम्यान झालेला पक्षाचा पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, याच निर्णयामुळे पार्थ पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीसह अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कारण, या कालावधीत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्रही रद्द ठरण्याची शक्यता आहे. त्याच आधारे पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे हे पत्र अमान्य ठरल्यास संपूर्ण निवड प्रक्रिया धोक्यात येऊ शकते.
याशिवाय, या कालावधीतच सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, तसेच पक्षातील इतर नियुक्त्याही करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे पत्र कायम राहिल्यास पक्षाच्या अंतर्गत निर्णयांनाच कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही बाब लक्षात आल्यानंतर सुनेत्रा पवार आता स्वतःच हे पत्र मागे घेण्याच्या तयारीत आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा न करता हे पत्र पाठवण्यात आल्याचीही चर्चा रंगली आहे.
एकूणच, या पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात मोठा गोंधळ निर्माण झाला असून, पुढील काही दिवसांत यावर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.


