Weather Alert : महाराष्ट्रात डिसेंबरच्या सुरुवातीला गुलाबी थंडीने जोर धरला आहे. राज्याच्या किमान तापमानात पुन्हा घट होत असून, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठ्याची लाट परतली आहे. शुक्रवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वात नीचांकी ८.६° सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर निफाड (नाशिकट नाशिक) येथे ९.९° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
नागपूर शहरात किमान तापमान १०.८° सेल्सिअसवर घसरले असून, कमाल तापमानातही घट झाल्याने संपूर्ण विदर्भ गारठला आहे. छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांतही थंडीचा कडाका वाढला आहे. जळगाव शहरात सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमान १२.६° सेल्सिअसवर स्थिर आहे, तर कमाल तापमान २७.८° सेल्सिअसवर घसरले. ग्रामीण भागात सकाळी आणि संध्याकाळी शेकोट्यांचे प्रमाण वाढले असून नागरिक उबदार कपडे आणि आग पेटवून थंडीपासून बचाव करत आहेत.
हवामान विभागाचा अंदाज
पुढील ४८ तासांत राज्याच्या बहुतांश भागांत किमान तापमानात २-३ अंशांची घट होईल. जळगाव परिसरात किमान तापमान ९° सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि रेडिएटिव्ह फॉगमुळे सकाळी दाट धुके पडून दृश्यमानता ४०० मीटरपर्यंत कमी होण्याची शक्यता. विदर्भ आणि मराष्ट्रात पुढचा आठवडाभर थंडीची लाट कायम राहील.
थंडीचा जोर वाढत असल्याने नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आणि गरजेनुसार उबदार कपडे वापरण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे.


