पुणे: पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पित्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या निरागस मुलाचा चाकूने भोसकून निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.२१) उघडकीस आला. या नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चाकू व ब्लेड जप्त करण्यात आले आहे.
आई वडिलांच्या वैयक्तिक संबंधातील बेबनावातून हिमत माधव टिकेटी या अवघ्या साडेतीन वर्षाच्या बालकाला प्राणाला मुकावे लागले. नात्यांमधील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने स्थानिक नागरिकांना कमालीचा धक्का बसला आहे. या बालकाची हत्या केलेला त्याचा पिता माधव साधुराव टिकेटी (वय ४१, रा. प्रेसटीज बिल्डिंग, तुकारामनगर, चंदननगर) या आयटी अभियंत्याला पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. माधव हा मूळचा परगावचा असून नोकरीनिमित्ताने तो पुण्यात स्थायिक झाला आहे. वाघोली परिसरातील आयटी कंपनीत तो संगणक अभियंता म्हणून नोकरीस आहे. पाच वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला व तो पत्नी स्वरूपा हिच्यासह चंदननगरमध्ये वास्तव्यास आला. त्यांना तीन वर्षांपूर्वी हिमत हा मुलगा झाला.
पत्नी स्वरूपाच्या चारित्र्याविषयी माधवला संशय होता. त्यामुळे उभयतांमध्ये नेहमी भांडणे होत असत. त्याच कारणावरून त्यांच्यात दोन दिवसांपूर्वीही कडाक्याचे भांडण झाले, त्यांनतर हिंमत गुरुवारी दुपारपासून बेपत्ता झाला. बराचवेळ तो न सापडल्याने त्याची आई स्वरूपा यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यामध्ये त्यांनी पती माधवविरुद्ध संशय व्यक्त केला होता.
दरम्यान, संवेदनशील प्रकरण असल्याने पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगून तपास जारी केला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने पोलिसांनी माधवला ताब्यात घेतले. मात्र, त्याने आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पडताळणी केली. त्यामध्ये माधव हिंमतला घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, त्याने एका दुकानांतून चाकू व ब्लेड खरेदी केल्याचीही माहिती पुढे आली.
त्यानंतर, पोलिसांनी त्याच्याकडे कसून तपास केल्यावर आपण हिंमतचा खून केल्याची कबुली त्याने दिली. चंदननगरमधून निर्जन भागात नेऊन माधवने चिमुरड्या हिंमतवर धारदार चाकूने वार करून निघृण खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले. या बालकाचा मृतदेह त्याच्या निवासस्थानी नेल्यावर स्थानिक रहिवाशांनाही अश्रू अनावर झाले. माधवविरुद्ध खुनाचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


