Uday Samant: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीमध्ये काही ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील युतीचा पेच आणि मुंबईच्या महापौराबाबत भाजप नेत्यांकडून होणाऱ्या विधानांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पुण्याच्या पेचावर एकनाथ शिंदेच घेणार अंतिम निर्णय
पुण्यातील उमेदवारी अर्जांवरून निर्माण झालेल्या वादावर भाष्य करताना सामंत म्हणाले की, पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका ही पक्षाची अधिकृत धोरणात्मक भूमिका नाही. मी स्वतः नीलम गोरे आणि रवींद्र धंगेकर यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र, पुण्यात मैत्रीपूर्ण लढत होणार की जागांचा तिढा सुटणार, याचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मिळून घेतील. कोणाचे अर्ज ठेवायचे आणि कोणाचे मागे घ्यायचे, हे वरिष्ठ स्तरावर ठरेल.
हेही वाचा – पुण्यात महायुतीत जागावाटपावरून मोठा तिढा; रवींद्र धंगेकर मोठा निर्णय घेण्याचा तयारीत
युती तुटल्याच्या अफवा पसरवू नका
पुण्यातील वादावरून ‘युती फुटली’ अशी चर्चा राज्यभर पसरवली जात असल्याबद्दल सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. एका शहरात काही मतभेद असतील तर त्याचा अर्थ युती संपली असा होत नाही. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर आणि पनवेल यांसारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये आमची युती यशस्वी झाली आहे. त्यामुळे केवळ वादाचीच चर्चा न करता सकारात्मक बाजूही समोर यायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले.
कृपाशंकर सिंगांच्या ‘महापौर’ विधानावर टोला
भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी उत्तर भारतीय महापौराबाबत केलेल्या विधानाला सामंत यांनी कडक शब्दांत फटकारले. महापौर कोण असावा किंवा पक्षाची रणनीती काय असावी, हे ठरवण्याचे अधिकार कृपाशंकर सिंगांना असतील असे मला वाटत नाही. मुंबईचा महापौर कोण होणार, याचा निर्णय महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून घेतील. त्यामुळे अशा वैयक्तिक विधानांना महत्त्व देण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी सिंग यांच्या विधानाचा विरोध केला.


