सोलापूर: जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर येत आहे. भूकंपाचे केंद्रबिंदू सांगोला तालुक्यात असल्याचे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने जाहीर केले आहे. हा भूकंप २.६ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता आणि याचे परिणाम सुमारे पाच किलोमीटरपर्यंतच्या परिसरात जाणवले.
आज (दि. ३) सकाळी साधारणपणे ११ वाजून २२ मिनिटांनी काही क्षणांसाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले. याविषयी राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने अधिकृत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. सदर भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्यापर्यंत नाही. मात्र, नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी मोठ्या प्रमाणात भूकंपाची नोंद नसली, तरी सांगोला तालुक्यात हे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसले होते, त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तींची शक्यता वर्तवली जात होती.
EQ of M: 2.6, On: 03/04/2025 11:22:07 IST, Lat: 17.41 N, Long: 75.21 E, Depth: 5 Km, Location: Solapur, Maharashtra.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjcVGs @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/DYZgG9zlg2— National Center for Seismology (@NCS_Earthquake) April 3, 2025
या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांना घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे सौम्य भूकंप हे पुढील मोठ्या भूकंपाची शक्यता दर्शवतात की नाही, यावर अद्याप संशोधन सुरू आहे. तसेच स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


