नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर ऑपेरेशनद्वारे घेतला आहे. भारताच्या या कृतीमुळे शेजारील देश अस्वस्थ झाला आहे. अशा परिस्थितीत पंजाबमध्ये आता हाय अलर्ट आहे. पंजाबच्या सीमावर्ती भागात असलेल्या गुरुदासपूरमध्ये दररोज रात्री ब्लॅकआउट असेल.
गुरुदासपूर जिल्ह्यात पुढील आदेश येईपर्यंत रात्री ९ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत ब्लॅकआउट लागू राहील. रात्री संपूर्ण जिल्हा अंधारात बुडालेला राहील. गुरुदासपूर पाकिस्तान सीमेला लागून आहे. भारत-पाक सीमेवरील संवेदनशील वातावरणामुळे भारत सरकार आणि पंजाब सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरी संरक्षण कायदा १९६८ अंतर्गत आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी गुरुदासपूरच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे.
हा आदेश मध्यवर्ती कारागृह गुरुदासपूर आणि रुग्णालयांना लागू होणार नाही. तथापि, या विभागांना हे सुनिश्चित करावे लागेल की मध्यवर्ती कारागृह गुरुदासपूर आणि रुग्णालयांच्या खिडक्या दररोज रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बंद आणि व्यवस्थित झाकल्या जातील जेणेकरून कोणताही प्रकाश बाहेर पडू नये.
रात्री उशिरा चार स्फोट झाले
बुधवारी रात्री १:१५ च्या सुमारास अमृतसरमधील जेतवाल, दुधला, माखनविंडी आणि पंढेर या गावांमध्ये रॉकेट पडले. एसएसपी मनिंदर सिंग यांनी याची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एकामागून एक सुमारे चार स्फोटांचे आवाज लोकांनी ऐकले. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित केला आणि ब्लॅकआउट केले. जप्त केलेल्या रॉकेटबद्दल, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे रॉकेट पाकिस्तानमधून डागले गेले असावेत. परंतु भारतीय हवाई दलाने ते आकाशातच नष्ट केले. यानंतर, त्यांचे अवशेष विविध गावांच्या शेतात पडले. गावातील काही लोक म्हणतात की, त्यांनी रात्री उशिरा स्फोटांचा आवाज ऐकला आणि त्यांच्या गावातील शेतात आकाशातून रॉकेट पडताना पाहिले. सध्या भारतीय लष्कर आणि पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.


