सातारा: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करून खंडणी मागितलेल्या महिलेच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी सातारा पोलीस राज्याच्या विधान परिषदेचे माजी उपसभापती रामराजे निंबाळकर यांच्या घरी दाखल झाले होते.त्यामुळे साताऱ्यात खळबळ उडाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातारा पोलिसांचे पथक रामराजे यांच्या फलटण येथील निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले. चौकशीसाठी त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे. त्यांच्या या संवादामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपांमध्ये रामराजेंचा काही हस्तक्षेप होता का, हे तपासलं जात आहे.वडूज पोलिसांनी या प्रकरणात अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली असली तरी, रामराजे यांची भूमिका निष्पक्ष होती की हेतुपुरस्सर संवाद झाला होता, याचा सखोल तपास केला जात आहे. फोन कॉलमध्ये साधारण संभाषण झाले की कोणता कट आखला गेला होता, याची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.
जयकुमार गोरे यांची बदनामी करून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात पत्रकार तुषार खरात आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. महिलेचा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत फोनवर संवाद झाल्याची माहिती चौकशीत समोर आली होती.याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रामराजेंच्या घरी पोलीस दाखल झाले.


