मुंबई: मंत्रालयातील जागेच्या अडचणीमुळे मंत्री कार्यालयांना सोयीची जागा उपलब्ध होत नसल्याने राज्य सरकारने मंत्रालय मुख्य इमारतीला लागून नवीन पाच मजली इमारत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ११० कोटी रुपये खर्चुन बांधण्यात येणारी ही इमारत येत्या ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मानस आहे. नव्या इमारतीत प्रत्येक मजल्यावर चारं दालने याप्रमाणे २० मंत्र्यांना आधुनिक आणि सुसज्ज दालन उपलब्ध होतील. नव्या इमारतीचे बाह्यस्वरूप मंत्रालय इमारतीशी सुसंगत असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सध्या ४० मंत्री आहेत. सुरुवातीला मंत्रालयात सर्व मंत्र्यांना त्यांच्या दालनांसाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे काही मंत्र्यांना विधानभवनात जागा देण्यात आली. मात्र, विधानभवनातील दालन गैरसोयीचे ठरत असल्याने मंत्र्यांनी मंत्रालयातच दालन मिळावे, असा आग्रह धरला होता. त्यामुळे काही कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालय विस्तारित इमारतीच्या सातव्या मजल्यावर जागा देण्यात आली. या मंत्री कार्यालयामुळे अनेक खाती मंत्रालयाबाहेर फेकली गेली. त्याचा परिणाम विभागाच्या कामकाजावर जाणवू लागला आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाला मंत्र्यांसाठी सुसज्ज इमारत बांधण्याचे लक्ष्य दिले. विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी बांधकाम खात्यातील अनुभवी आणि तज्ज्ञ अभियंत्यांच्या मदतीने हे आव्हान स्वीकारले आहे. त्यानुसार इमारत बांधकामाचा कार्यारंभ आदेश १ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आला.


