नवी दिल्ली: देशभरात वाढत्या टेलीकॉम फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी संचार साथी पोर्टलद्वारे आतापर्यंत ३.४ कोटींहून अधिक मोबाईल क्रमांक आणि ३.१९ लाख आयएमईआय नंबर ब्लॉक करण्यात आले आहेत. शिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि बिग डेटाच्या मदतीने १६.९७ लाख व्हॉट्सअॅप खातीदेखील बंद करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.
दूरसंचार विभागाकडून संचार साथी उपक्रमांतर्गत २० हजारहून जास्त एकगठ्ठा एसएमएस पाठविणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. राज्यसभेत एका प्रश्नाचे लिखित उत्तर देताना संचार आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर यांनी यांसबंधीची माहिती दिली. सरकारच्या संचार साथी पोर्टलवरून नागरिकांना ‘चक्षु’ पर्यायाच्या मदतीने संशयित फसवणुकीशी संबंधित कम्युनिकेशनबाबत तक्रार करण्याची सुविधा मिळते. अशा तक्रारींचा तपास दूरसंचार विभागाकडून केला जातो. तपासात काही चुकीचे आढळल्यास असे क्रमांक बंद केले जातात. दूरसंचार विभागाकडून एआय आणि बिग डेटा विश्लेषणाच्या मदतीने बनावट दस्तावेजांवर घेण्यात आलेल्या संशयित मोबाईल क्रमांकाची ओळख पटविण्याचे काम केले जाते.
याशिवाय, दूरसंचार विभाग आणि दूरसंचार सेवा प्रदाते (टीएसपी) कडून नवीन प्रणाली तयार करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बनावट फोनकॉलची ओळख पटवून त्यावर बंदी घालण्याचे काम या प्रणालीकडून केले जाते. दरम्यान, दूरसंचार सेवा कंपन्यांनी ११५० संस्था आणि व्यक्तीवर निर्बंध घातले आहेत. १८.८ लाखाहून अधिक रिसोर्सेसदेखील तोडण्यात आले आहेत. या कारवायांमुळे अनोंदणीकृत टेलीमार्केटर्स (यूटीएम) विरोधातील तक्रारी घटल्या आहेत. ऑगस्ट २०१४ मध्ये अशा १,८९,४१९ तक्रारी मिळल्या होत्या. पण जानेवारी २०२५ मध्ये ही संख्या कमी होऊन १,३४,८२१ वर आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने १२ फेब्रुवारी रोजी दूरसंचार वाणिज्यिक संचार ग्राहक प्राधान्य नियम्स (टीसीसीपीआर) – २०१८ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.


