Ajit Pawar On Nashik Tapovan: नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान तपोवन परिसरातील झाडे तोडण्यात येणार असल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या मंजुरीनंतर सुरू झालेल्या या हालचालींवर पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि अभिनेते एकाच सुरात नाराजी व्यक्त करत आहेत. वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही उघडपणे भूमिका घेत तपोवनातील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया X वर लिहिताना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की, तपोवनातील विवादासंबंधी निर्णय संवादातून आणि समन्वयातून घ्यावा. सयाजी शिंदे यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मांडलेली भूमिका योग्य आहे. विकासाची गरज मान्य आहे, पण त्याला पर्यावरणपूरक दृष्टिकोन जोडला गेला पाहिजे. पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर निसर्गसंपत्ती जपणे अत्यावश्यक आहे, असे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी तपोवनाच्या मूळ संकल्पनेची आठवण करून देत सांगितले की, ध्यान-तपश्चर्येचा केंद्रबिंदू असलेला हा परिसर हिरवाईने नटलेला आहे. पर्यायी जागा उपलब्ध असतानाही तपोवनातीलच झाडांवर आरी फिरवण्याचा हट्ट का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
झाडे तोडून सोयीसुविधा उभारण्याचा आग्रह कशासाठी?
सूरज चव्हाण पुढे म्हणाले की, कुंभमेळ्याला येणारे भाविक काही किलोमीटर अंतर पायी चालू शकत नाहीत असे नाही. प्रयागराजच्या कुंभमेळ्यातही अनेकांनी ३० किलोमीटर पायी प्रवास करून शाही स्नान केले. मग आपल्या येथेच झाडे तोडून सोयीसुविधा उभारण्याचा आग्रह कशासाठी? तसेच, जुनी झाडे तोडून त्याऐवजी दुसरीकडे नवीन झाडे लावू, असा युक्तिवाद कसा योग्य ठरेल? अस्तित्वात असलेली वृक्षसंपत्ती वाचवणे हेच सर्वात महत्त्वाचे, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका; साधूग्रामवरून राज ठाकरेांचा सरकारवर घणाघात
तपोवनातील हिरवाई ही नाशिकची ओळख
शेवटी त्यांनी सरकारला आवाहन करत म्हटले, वृक्षतोडीसंदर्भात पुन्हा एकदा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. तपोवनातील हिरवाई ही नाशिकची ओळख आहे, ती नष्ट होता कामा नये. तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड आता फक्त प्रशासकीय निर्णय राहिलेला नसून तो पर्यावरण, परंपरा आणि विकास यांच्या समतोलाशी निगडित मोठा सामाजिक-राजकीय मुद्दा ठरत आहे. या प्रकरणात अंतिम निर्णय काय होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


