Raj Thackeray on Nashik Tree Cutting: नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. याच अनुषंगाने तपोवन परिसरात सुमारे 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे काम हाती घेतले जात आहे. मात्र, या प्रकल्पासाठी जवळपास 1800 झाडांची कत्तल करण्याची प्रस्तावित योजना समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अनेक सेलिब्रिटी यांच्यात संताप निर्माण झाला आहे. वृक्षतोडीच्या या निर्णयाचा जोरदार विरोध होत असताना शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली होती. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनीही सरकारवर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत.
राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे संताप व्यक्त करत म्हटले की, कुंभमेळा नाशिकमध्ये आधीही झाला. त्यावेळीही मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या. त्या वेळी प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये उत्तम समन्वय होता आणि जनतेच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले. इतकेच नाही तर या कामांची दखल घेऊन तत्कालीन महापौर आणि आयुक्तांचा अमेरिकेत सत्कारही झाला होता. “तेव्हा एकाही झाडाची कत्तल करावी लागली नव्हती. मग आता 1800 झाडं का तोडायची?” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा – राज ठाकरेंना मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने दिला मनसे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
ते पुढे म्हणाले, “झाडं तोडून दुसरीकडे झाडं लावू, अशी पोकळ आश्वासने सरकारने देऊ नयेत. जर सरकारकडे पाचपट झाडं लावण्याइतकी जागा आहे, तर तिथेच साधूग्राम उभारा. साधूंच्या नावाखाली उद्योगपतींना फायदा करून देण्याचा हा प्रयत्न वाटतो.” भाजप सरकारने पूर्वी लाखोंच्या संख्येने झाडं लावल्याच्या घोषणा केल्या होत्या, पण ती झाडं कुठेच दिसत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने झाडांची कत्तल करून जमीन सपाट करायची आणि पुढे ती आवडत्या उद्योगपतीकडे वळवायची हीच सरकारची योजना असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला. “सध्या सत्ताधारी नेते, मंत्री व त्यांचे वर्तुळ जमीन बळकावण्याच्या आणि उद्योगपतींचे दलाल म्हणून वावरण्याच्या कामात व्यस्त आहेत,” असा घणाघात त्यांनी केला. वृक्षतोडीविरोधात नाशिककरांनी घेतलेल्या ठाम भूमिकेला राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला. “नाशिककरांनी ठाम राहावे, मनसे तुमच्या पाठीशी उभा राहील. या वृक्षतोडीला आमचा विरोध कायम राहणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तथापी, सरकारने संघर्षाचा मार्ग स्वीकारला तर मनसे जनतेसोबत रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.


