पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कुख्यात गुंड गजानन उर्फ ‘गजा मारणे’ याला विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. २७७ दिवसांच्या तुरुंगवासानंतर शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) जेलबाहेर आल्यानंतर मारणे याने थेट पुणे पोलिस आयुक्तालयात हजेरी लावली. मात्र, पोलिसांनी त्याला पुणे शहरात राहण्यास मनाई केली असून, या प्रकरणाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
प्रकरणाचा गावठी वाद ते मोक्का कारवाई
या प्रकरणाची सुरुवात १९ फेब्रुवारी २०२५ रोजी कोथरूडमधील शिवजयंती मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून झाली. भाजप कार्यकर्ते असलेल्या आयटी अभियंता देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी गजा मारणे, त्याचा भाचा रूपेश मारणे आणि इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर गुन्हे शाखेने टोळीप्रमुख म्हणून मारणे यांच्यावर मोक्का लावला आणि २४ फेब्रुवारीला अटक केली. न्यायालयाने शिक्षा सुनावली असली तरी फिर्यादी जोग यांनी न्यायालयात हजर राहून “कुणीही चिथावणी दिली नाही” असे प्रतिज्ञापत्र दाखल केले. यामुळे मारणेच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला, जो एक लाख रुपयांच्या जात-मुचलक्यावर मंजूर झाला.
वकिलाचा बनावट प्रकरणाचा आरोप
मारणेचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले की, “हे प्रकरण पूर्णपणे बनावट आहे. रस्त्यावर सामान्य भांडण झाले, पण आम्ही कधीही धमकी दिली नाही. तपासात पूर्ण सहकार्य केले, मारणे कधीच फरार नव्हता आणि स्वतः पोलिस स्टेशनला हजर झाला.” यापूर्वी मे २०२५ मध्ये जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता, पण तक्रारदाराच्या भूमिकेमुळे आता सुटका झाली.
गजा मारणे कोण? गुन्हेगारीची काळा इतिहास
पुण्यातील गुन्हेगारी जगतात ‘गजा मारणे’ हे नाव दहशतीचे प्रतीक आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे या दोघांच्या खुनाप्रकरणी त्याला अटक झाली होती आणि तीन वर्षे येरवडा कारागृहात होता. त्याच्यावर सहापेक्षा जास्त खुनाचे गुन्हे दाखल आहेत.
२०२३ मध्ये एका व्यावसायिकाकडून २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणीही कोर्टाने जामीन मंजूर केला होता. जामीनानंतर काढलेली त्याची रॅली शहरभर चर्चेचा विषय ठरली. पुणे पोलिसांनी एकदा त्याला ‘धिंड’ काढून गुडघ्यावर बसवले होते, जेणेकरून दहशतीला चाप बसावा. मात्र, नंतर मारणे यांच्यासोबत काही पोलिसांनी पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आणि पाच पोलिस निलंबित झाले होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर अशा गुंडाला जामीन मंजूर होणे हे पुणे पोलिस आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जामीनानंतर मारणे याने गुन्हे शाखेच्या उपायुक्तांसमोर हजेरी लावली आणि पुणे महापालिकेच्या हद्दीबाहेर राहण्याच्या अटीवर शहराबाहेर रवाना झाला. या घटनेमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव आणि गुन्हे नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिस तपास सुरू असून, मारणेच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.


