पुणे: नुकताच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतिम निकाल १ (१ ली ते ५ वी गट) आणि पेपर २ (६ वी ते ८ वी गट) प्रसिद्ध झाला असून, या परीक्षेत ३.३८ टक्के इतकेच उमेदवार पात्र ठरले आहेत. उमेदवारांना त्यांचा निकाल शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.
या परीक्षेसाठी एकूण ३ लाख ५३ हजार ९५२ परीक्षार्थ्यांपैकी ११ हजार १८८ परिक्षार्थी पात्र ठरले होते. अंतरिम निकाल ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करून १० फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात आले होते. शुक्रवारी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. पेपर १ (१ ली ते ५ वी गट) साठी १ लाख ५२ हजार ८०५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील ४ हजार ७०९ उमेदवार पात्र ठरले. पेपर २- गणित विज्ञान (६ वी ते ८ वी गट) ७५ हजार ५९९ उमेदवार प्रविष्ट झाले, त्यातील २१ हजार ४१४ उमेदवार पात्र ठरले. तर पेपर २-सामाजिकशास्त्र (६वी ते ८ वी गट) १ लाख २५ हजार ७४८ उमेदवार प्रविष्ट झाले असून, ४ हजार पात्र ठरले आहेत.
वर्षात दोनदा परिक्षा घेण्याची मागणी
राज्यात टिईटी परीक्षांचा निकाल लागला. परंतु, निकाल कमी प्रमाणात लागल्यामुळे लाखो भावी शिक्षकांना पुढच्या शिक्षक अभियोग्यता परिक्षासाठी पात्र होऊ शकत नाहीत. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात सुद्धा एका वर्षात दोनवेळा परीक्षा घेतल्यास उत्तीर्ण संख्या वाढू शकेल व पुढील खाजगी आस्थापन किंवा शासनाच्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये त्याला संधी मिळेल. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.


