Jalgaon Crime : मित्रांसोबत गप्पा मारत असताना एका गावठी कट्ट्यातून अचानक सुटलेली गोळी काळ ठरली आहे. अमळनेरमधील अमलेश्वर नगर परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या या थरारक घटनेत ३५ वर्षीय व्यावसायिक अरुण सुरेश महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांनी संशयित आरोपी मित्रावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
मंडप व्यवसायानिमित्त परिचित असलेले अरुण महाजन शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास माळीवाडा भागात मित्रांसोबत बसले होते. यावेळी त्यांचा मित्र भूषण महाजन याच्याकडे असलेला गावठी कट्टा तो सर्वांना दाखवत होता. पिस्तुलची माहिती देत असताना आणि ते हाताळत असताना अचानक ट्रिगर दाबला गेला. ‘मिसफायर’ झालेली गोळी थेट अरुण यांच्या छातीत घुसली आणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसी तपास आणि संशय
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पथकासह धाव घेतली. प्राथमिक दृष्ट्या हा अपघात वाटत असला तरी, पोलिसांनी भूषण महाजन विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. भूषणकडे हा गावठी कट्टा कोठून आला?गोळी झाडली जाण्यापूर्वी मित्रांमध्ये काही वाद झाला होता का? हा केवळ निष्काळजीपणा आहे की यामागे काही नियोजित कट आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.


