Iran US War : अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे सुरू असलेली महत्त्वाची शांती चर्चा अखेर निष्फळ ठरली आहे. जवळपास २१ तास चाललेल्या या चर्चेत कोणताही ठोस निष्कर्ष न निघाल्याने जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.
या चर्चेनंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आम्ही प्रामाणिक हेतूने आलो होतो, मात्र इराण कराराच्या अटी मान्य करण्यास तयार नाही.” त्यांनी तातडीने अमेरिकेला परत जात असल्याचेही स्पष्ट केले असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती देणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, इराणकडून मात्र अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा फिस्कटल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये तब्बल ४७ वर्षांनंतर समोरासमोर चर्चा झाली होती, त्यामुळे या बैठकीकडे जगाचे लक्ष लागले होते.
या बैठकीत सुरक्षा, राजकीय, लष्करी, आर्थिक आणि कायदेशीर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. इराणने लेबनॉनवरील हल्ले थांबवणे, होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण, युद्धभरपाई आणि गोठवलेल्या मालमत्तेची मुक्तता अशा काही प्रमुख अटी अमेरिकेसमोर ठेवल्या होत्या. मात्र विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये एकमत होऊ शकले नाही.
चर्चा सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर टीका करत त्याला “अपयशी देश” म्हटले, ज्यामुळे तणाव आणखी वाढल्याचे मानले जात आहे. या घडामोडीनंतर आता पुढे अमेरिका कोणती भूमिका घेणार आणि या तणावाचे रूपांतर संघर्षात होणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.


