Nashik Crime : नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना सिडको परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट) चे विभागप्रमुख सुयश पाटील यांच्यावर ६ ते ७ जणांच्या टोळक्याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना सिडकोतील दत्त चौक परिसरात सोमवारी रात्री उशिरा घडली. अचानक आलेल्या हल्लेखोरांनी पाटील यांच्यावर सपासप वार करत त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडले. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करून घटनास्थळावरून पलायन केले. या संपूर्ण घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला जुन्या वादातून झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन हल्लेखोर स्पष्ट दिसत असून त्यांच्या ओळखीचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. दरम्यान, या घटनेमुळे नाशिकच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.


