Nagpur Accident : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे एक हृदयद्रावक अपघात घडला असून दोन तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सक्षम बनसोड आणि आर्यन सोनटक्के (वय २०) अशी मृतांची नावे असून, दोघेही विधी शिक्षण घेत होते.
ही घटना नागपूर-वर्धा मार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम आणि आर्यन हे दोघेही डोंगर परिसरात जेवणासाठी गेले होते. परत येत असताना अंधारामुळे रस्त्यालगत असलेला खाणीचा खोल खड्डा त्यांना दिसला नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी थेट खड्ड्यात कोसळली.
अपघातानंतर दोघेही जखमी अवस्थेत रात्रभर तिथेच पडून होते. मात्र, वेळेत मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी मित्रांनी शोध घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. स्थानिक मजुरांना खड्ड्यात दोघेही गंभीर जखमी अवस्थेत आढळले.
त्यांना तत्काळ नागपूर येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे नागपूरच्या विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघे वसतिगृहातून रात्री बाहेर कसे गेले आणि नेमके कुठे गेले होते, याचा तपास सुरू आहे.


