Eknath Shinde : महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणूक 2026 जाहीर होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही ‘धक्कातंत्र’ वापरण्याची शक्यता वर्तवली जात असून, अनुभवी नेत्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा रंगली आहे.
12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीत 10 जागांसाठी मतदान होणार असून, त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागांपैकी एक जागा जवळपास निश्चित मानली जात आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
मात्र दुसऱ्या जागेसाठी पक्षात मोठी चुरस निर्माण झाली आहे. या जागेसाठी रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी आणि दिपक सावंत यांसारख्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
विधानसभेतील शिवसेनेचे संख्याबळ पाहता दुसरी जागा जिंकण्यात अडचण नसली तरी उमेदवार निवडीत शिंदे कोणता निर्णय घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, राज्यसभेप्रमाणे सामान्य कार्यकर्त्यालाही संधी देण्याचा पर्याय खुला ठेवला जाऊ शकतो.
दरम्यान, पक्षातील काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळात फेरबदल करत ‘नवे चेहरे’ पुढे आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. धाराशिव आणि सोलापूरमध्ये अलीकडेच दिसलेली नाराजी लक्षात घेता, शिंदे कोणते मोठे निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


