Jalgaon News : जळगाव शहरात लाचखोरी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून शनिपेठ पोलीस ठाण्यातील एका पोलिस नाईकाला थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पितांबर अहिरे या पोलिस नाईकाला तक्रारदाराकडून 1 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) च्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. ही कारवाई पोलीस ठाण्याच्या आवारातच करण्यात आली होती.
या प्रकरणाचा अहवाल मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने कठोर भूमिका घेत संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला थेट बडतर्फ करण्याचे आदेश दिले. साधारणपणे अशा प्रकरणांमध्ये निलंबनाची कारवाई होते, मात्र थेट बडतर्फीचा निर्णय घेतल्याने प्रशासनात मोठी चर्चा रंगली आहे.
याच प्रकरणात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत शनिपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक कावेरी कमलाकर यांची नियंत्रण कक्षात तात्काळ बदली करण्यात आली आहे.
तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध कारवाई न करण्यासाठी आरोपीने सुरुवातीला 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने ACB कडे धाव घेतल्यानंतर 13 एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. पडताळणीत आरोपीने 1 लाख रुपये स्वीकारण्यास संमती दिली आणि पैसे घेताना त्याला पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. दरम्यान, ACB ने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास त्वरित तक्रार करावी. भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई पुढेही कठोरपणे सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


