MSRTC Big Decision : राज्यातील एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. MSRTCच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर दौऱ्यात ही घोषणा केली. त्यानुसार, येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
याशिवाय, एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल ८ हजार नव्या बसची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बस टप्प्याटप्प्याने राज्यभरात उपलब्ध करून देण्यात येणार असून, यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत.
तसेच, बस स्थानकांवरील कॅन्टीनमध्ये प्रवाशांना ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कॅन्टीनवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाहणीदरम्यान काही कॅन्टीनमध्ये दर लपवण्याचा प्रकार समोर आला. यावर मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना फटकारत प्रवाशांची फसवणूक सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


