Harivansh Narayan: राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश नारायण यांची सलग 3 यांदा बहुमताने निवड झाली आहे. त्यांच्या या ऐतिहासिक निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात त्यांचे विशेष कौतुक केले. “सलग 3 वेळा या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी मिळणे, हा संपूर्ण सभागृहाचा हरिवंशजींच्या कार्यपद्धतीवर असलेला अगाध विश्वास अधोरेखित करतो,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
चंद्रशेखरजींच्या आठवणींना उजाळा
विशेष योगायोग म्हणजे, 17 एप्रिल रोजी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची जयंती असतानाच हरिवंशजींची निवड झाली. याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, हरिवंशजींचे चंद्रशेखरजींशी अत्यंत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. त्यांनी केवळ चंद्रशेखरजींसोबत काम केले नाही, तर त्यांच्या जीवनप्रवासावर पुस्तके लिहून त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोठे कार्य केले आहे.
लेखणी भेदक, पण स्वभाव शांत
हरिवंश नारायण यांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या अनुभवाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव सभागृहाचे कामकाज चालवताना अत्यंत मोलाचा ठरत आहे. त्यांची लेखणी जितकी टोकदार आणि भेदक आहे, तितकीच त्यांची बोलण्याची पद्धत शांत, संयत आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहे. जयप्रकाश नारायण यांच्या गावात जन्मलेले आणि काशीमध्ये शिक्षण घेतलेले हरिवंशजी आजही आपल्या ग्रामीण मुळांशी घट्ट जोडलेले आहेत, असेही पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले.
सभागृहाची प्रतिष्ठा वाढवणारे व्यक्तिमत्व
राज्यसभेचे कामकाज शिस्तबद्ध आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यात हरिवंशजींची भूमिका कळीची राहिली आहे. उच्च व्यावसायिक मानके आणि नैतिक मूल्ये जपणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख सर्वपक्षीय खासदारांमध्ये आहे. त्यांच्या या नवीन कार्यकाळामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेत अधिक भर पडेल, असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्यांच्या या निवडीचे सभागृहातील सर्व सदस्यांनी स्वागत केले आहे.


