Pune News : पुणे महापालिकेत ५० टक्के महिला आरक्षणामुळे मोठ्या प्रमाणावर महिला नगरसेविका निवडून आल्या. शहराच्या कारभारात महिलांचे नेतृत्व ठळकपणे दिसेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात वेगळेच चित्र समोर येत आहे.
निवडून आलेल्या अनेक महिला नगरसेविकांच्या जागी त्यांच्या नातेवाईकांचा पती, भाऊ, वडील किंवा इतर कुटुंबीयांचा प्रशासकीय कामात हस्तक्षेप वाढल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराला स्थानिक पातळीवर ‘झेरॉक्स नगरसेवक’ अशी उपमा दिली जात आहे.
निवडणुकीत मोठ्या संख्येने इच्छुक असलेल्या काही पुरुष नेत्यांना थेट उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कुटुंबातील महिलांच्या नावावर तिकीट घेतले. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर मात्र प्रत्यक्ष कारभारात हेच नातेवाईक पुढे असल्याचे चित्र आहे.
प्रभाग समितीच्या बैठका, क्षेत्रीय कार्यालये आणि ठेकेदारांशी व्यवहार यामध्ये या ‘कारभाऱ्यांचा’ मोठा हस्तक्षेप दिसत आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव, दमदाटी आणि अनावश्यक हस्तक्षेप वाढल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
काही भागांमध्ये मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही आरोप आहेत. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या समस्यांवर अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची नाराजी नागरिकांत आहे. त्याचवेळी ठेकेदारांशी संगनमत, निविदा प्रक्रियेत गैरप्रकार अशा चर्चांनाही उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने ‘पती-कारभारी’ आणि नातेवाईकांच्या हस्तक्षेपावर लगाम घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा महिला आरक्षणाचा मूळ उद्देशच धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


