Dokadia Family Case: दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा झालेला संशयास्पद मृत्यू सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या दुर्घटनेमागे कलिंगड कारणीभूत असल्याचा प्राथमिक संशय अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अहवालामुळे आता फेटाळला गेला आहे. डोकाडिया कुटुंबाने खाल्लेल्या कलिंगडात कोणत्याही प्रकारचे विषारी घटक किंवा भेसळ आढळली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नेमकी घटना काय?
गेल्या २५ एप्रिलच्या रात्री डोकाडिया दांपत्य आणि त्यांच्या दोन मुलींनी कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर काही तासांतच त्यांना तीव्र उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. उपचारादरम्यान या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कलिंगडातून ‘फूड पॉयझनिंग’ झाल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने पोलिसांनी घरातील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते.
FDA अहवालातील महत्त्वाचे मुद्दे:
कलिंगडाचा आकार वाढवण्यासाठी किंवा त्यात गोडवा आणि रंग आणण्यासाठी कोणत्याही घातक रसायनांचा वापर केलेला नव्हता. एफडीएने घरातून बिर्याणी, चिकन, पाणी, तांदूळ आणि मसाल्यांसह एकूण ११ नमुने गोळा केले होते. प्राथमिक चाचणीत या कोणत्याही पदार्थात भेसळ आढळलेली नाही. कलिंगड सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या मृत्यूंचे नेमके कारण काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
फॉरेन्सिक अहवालातील धक्कादायक निरीक्षणे
कलिंगड जरी ‘क्लीन’ असले तरी फॉरेन्सिक अहवालाने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मृतांच्या शरीराचे विच्छेदन केल्यावर तज्ज्ञांना काही अत्यंत विसंगत गोष्टी आढळल्या. मृतांचे हृदय, मेंदू आणि आतडी हिरवट पडल्याचे दिसून आले आहे. शरीरातील एकाच वेळी अनेक अवयवांची ही स्थिती सामान्य अन्न विषबाधेत (Food Poisoning) सहसा दिसत नाही. हे संपूर्ण शरीरात विष पसरल्याचे लक्षण असू शकते. खाद्यपदार्थांत दोष नसल्याने आता संपूर्ण तपास बॅक्टेरियल चाचण्या आणि फॉरेन्सिक रिपोर्टवर केंद्रित झाला आहे. या कुटुंबाच्या मृत्यूचे हे रहस्य उलगडण्यासाठी आता पोलीस आणि आरोग्य विभाग सखोल चौकशी करत आहेत.


