BJP-Shivsena Alliance : भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. महायुतीत सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र असतानाच शिंदे गटातील एका नेत्याच्या वक्तव्यामुळे २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी करत सत्ता कायम राखली. या निवडणुकीत भाजपला १३५, शिंदेसेनेला ५७ आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. या निकालानंतर भाजप महायुतीतील मोठा भाऊ म्हणून अधिक प्रभावी ठरला.
मात्र, २०२९ च्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. भाजप अधिक जागांवर दावा करू शकतो, तर शिंदेसेनेकडूनही स्वतःची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
शिंदे गटातील नेत्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर प्रतिक्रिया देतानाउदय सामंत यांनी प्रत्येक पक्षाला स्वतःचा विस्तार करण्याचा अधिकार असल्याचे सांगत वाद शमवण्याचा प्रयत्न केला.
राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी काळात दोन्ही पक्षांची संघटनात्मक वाढ, स्थानिक पातळीवरील स्पर्धा आणि जागावाटपाचा फॉर्म्युला हेच युतीचे भवितव्य ठरवतील. त्यामुळे २०२९ मध्ये महायुती कायम राहणार की नवा राजकीय संघर्ष उभा राहणार, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.


