Devendra Fadnavis: आखाती देशांमधील तणाव आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे सावट भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार समर्थन केले आहे. “पंतप्रधानांनी सुचवलेले उपाय ही काळाची गरज असून, नागरिकांनी संयम पाळला नाही तर आपल्यालाही मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल,” असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
शेजारील देशांची स्थिती भीषण; भारताला सावध राहण्याची गरज
नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. शेजारील पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर ४५० रुपये लिटरवर पोहोचले आहेत. युद्धामुळे जगभरात इंधनाचा तुटवडा असतानाही मोदी सरकारने भारतात पुरवठा खंडित होऊ दिला नाही. मात्र, हा पुरवठा टिकवून ठेवण्यासाठी आता बचतीचे धोरण स्वीकारणे अनिवार्य आहे.
मेट्रो आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवा
पंतप्रधानांच्या आवाहनाचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, भारताकडे स्वतःच्या मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे आपण आयातीवर अवलंबून आहोत. अशा वेळी ज्या शहरांमध्ये मेट्रो सुविधा आहे, तिथे जनतेने खासगी वाहने सोडून मेट्रोचा वापर करावा. तसेच, बैठकांसाठी प्रत्यक्ष प्रवास न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर केल्यास कच्च्या तेलावरील खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. देशाचा परकीय चलन साठा सुरक्षित ठेवणे ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण आताच सावध झालो, तरच जागतिक संकटाच्या झळांपासून देशाला वाचवू शकू, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.


