Maharashtra Weather : राज्यात सध्या दुहेरी हवामानाचा फटका बसत असून एका बाजूला प्रचंड उष्णता तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी पुढील 24 तासांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दुसरीकडे कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा कहर कायम आहे. जळगावमध्ये राज्यातील उच्चांकी 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून अकोला आणि मालेगावमध्येही पारा 42 अंशांच्या पुढे गेला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
हवामान विभागाने नागरिकांना दुपारी बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, स्कायमेटच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असून त्याचा सकारात्मक परिणाम मान्सूनच्या आगमनावर होणार आहे. त्यामुळे यंदा अंदमानात मान्सून वेळेआधी दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


