Eknath Shinde : ठाण्यातील गावदेवी मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत अग्निशमन दलाच्या जवान आणि सुरक्षारक्षकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमी दोन जवानांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदतही देण्यात येणार आहे.
गुरुवारी पहाटे ठाण्यातील गावदेवी मार्केट येथे भीषण आग लागली होती. आग विझवताना एका अग्निशमन जवानासह सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संध्याकाळी घटनास्थळी भेट देत एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि माध्यमांशी संवाद साधताना मदतीची घोषणा केली.
यावेळी शिंदे म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आग विझवताना दोन जणांनी जीव गमावला. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.” तसेच गावदेवी मार्केटसह ठाण्यातील इतर बाजारपेठांचे तातडीने इलेक्ट्रिक आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
मृत जवानांच्या कुटुंबियांना विम्याचे १२ लाख रुपये तातडीने देण्यात येतील, तसेच ठाणे महापालिकेकडून अतिरिक्त १० लाख रुपयांची मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
या आगीत गावदेवी मार्केटमधील अनेक दुकाने आणि गाळे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. मध्यरात्री आग लागल्यामुळे व्यापाऱ्यांना आपले साहित्य बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
ठाणे महापालिका आयुक्तांना मार्केट परिसर तातडीने स्वच्छ करून आवश्यक दुरुस्ती आणि इलेक्ट्रिक काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील दहा दिवसांत व्यापाऱ्यांना पुन्हा गाळे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.
कळवा रुग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट
यानंतर एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येथे जाऊन जखमी अग्निशमन जवानांची विचारपूस केली. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांनी आवश्यक असल्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याचे निर्देशही दिले.


