Indapur Crime: कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून विवाहित पत्नीला पुन्हा नांदवण्यास नकार देत, तिचा छळ केल्याची धक्कादायक घटना इंदापूर येथे समोर आली आहे. दुसरी पत्नी घरात ठेवण्यास विरोध केल्यास “फाशी घेऊन आत्महत्या करीन आणि तुला अडकवीन,” अशी धमकी पतीने दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी पत्नी घरात ठेवण्यासाठी पतीचा तगादा आणि धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम अमोल गायकवाड (वय ३२, रा. इरिगेशन कॉलनी, इंदापूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांचे पती अमोल जगन्नाथ गायकवाड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पूनम आणि आरोपी अमोल यांच्यात प्राथमिक कारणावरून वाद झाले होते. यावेळी पती अमोल याने त्याचे बाहेर एका महिलेसोबत प्रेमसंबंध असून तिच्यासोबत लग्न केल्याची कबुली पत्नीला दिली. तसेच, “मी तुला आता घरी नांदवायला आणणार नाही,” असे स्पष्ट सांगितले. यावर पूनम यांनी “मी तुझी पत्नी असून मला तुझ्या घरी राहू दे,” अशी विनवणी केली असता, आरोपीने संतप्त होऊन, “तू जर त्या महिलेला घरी राहू दिले नाहीस, तर मी फाशी घेऊन आत्महत्या करीन आणि तुला अडकवीन,” अशी थेट धमकी दिली.
मानसिक त्रासाला कंटाळून पत्नीची पोलिसांत धाव
पतीकडून मिळणाऱ्या या सततच्या मानसिक त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर पीडित महिलेने इंदापूर पोलीस ठाणे गाठून आपली आपबिती सांगितली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी अमोल गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खान करत आहेत.


