Pinarayi Vijayan ED Raid: केरळच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक वृत्त समोर आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी अचानक शोधमोहीम सुरू केल्याने संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईची माहिती मिळताच डाव्या आघाडीचे (CPM) नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने विजयन यांच्या घराबाहेर एकवटले. सुरुवातीला शांततेत असलेल्या या निदर्शनांनी काही वेळातच हिंसक वळण घेतले. संतप्त गर्दीने सुरक्षेचे कडे तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला, तसेच सुरक्षा रक्षकांच्या दिशेने हेल्मेट आणि बाटल्या भिरकावल्या. या गोंधळात आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्या वाहनांवर जोरदार दगडफेक केली, ज्यामध्ये गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ईडी न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत
शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे आणि तपास पथकावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे ‘ईडी’ने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या हिंसक घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, केंद्रीय यंत्रणेच्या अधिकारांवर झालेल्या या हल्ल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचे संकेत ईडीने दिले आहेत. सुदैवाने, या दगडफेकीत कोणत्याही अधिकाऱ्याला दुखापत झालेली नाही.
‘CMRL’ कंपनी आणि कोट्यवधींच्या घोटाळ्याचा संशय
हा संपूर्ण तपास कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड (CMRL) या कंपनीशी संबंधित असलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणाशी जोडलेला आहे. बनावट खर्चाच्या नोंदी दाखवून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा या कंपनीवर आरोप असून, यामध्ये पिनराई विजयन यांची कन्या वीणा विजयन यांचे नाव संशयाच्या भोवऱ्यात आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने केरळमधील कन्नूर, एर्नाकुलम, तिरुवनंतपुरम आणि शेजारच्या बंगळुरूमधील तब्बल १० ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले.
या घोटाळ्याची पाळेमुळे २०१९ मधील आयकर विभागाच्या कारवाईत सापडली होती, जिथे १३० कोटींचा संशयास्पद खर्च समोर आला होता. पुढे गंभीर फसवणूक तपास कार्यालयाच्या (SFIO) चौकशीत हा आकडा १८२ कोटी रुपयांवर गेल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, कंपनीने गुंतवणूकदारांना कोणताही फायदा न देता व्यवस्थापकीय संचालकांना थेट ३०.६३ कोटी रुपये दिल्याचे उघड झाले होते.


