Maval Accident: देशभरात सुरू असलेल्या जनगणनेच्या राष्ट्रीय कामावर जात असताना एका महिला शिक्षिकेवर काळाने घाला घातला आहे. मावळ तालुक्यातील अहिरवडे गावाकडे दुचाकीवरून जात असताना, एका सुसाट कंटेनरने त्यांच्या गाडीला पाठीमागून भीषण धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, या धडकेत शिक्षिकेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कान्हे फाटा चौकात बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. देशाच्या कर्तव्यावर असतानाच शिक्षिकेचा असा अंत झाल्याने शिक्षण क्षेत्रात आणि मावळ परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. दीपाली सुजित तांबे (वय ५०, सध्या रा. तानाजीनगर, चिंचवड, पुणे; मूळ रा. मंचर, खेड) असे अपघातात प्राण गमावलेल्या जनगणना शिक्षिकेचे नाव आहे.
परीक्षा आणि कर्तव्य ठरले अंतिम
मिळालेल्या माहितीनुसार, मृत दीपाली तांबे या कान्हे जवळील अहिरवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून सेवेत होत्या. सध्या त्यांच्याकडे शासनाच्या वतीने जनगणनेच्या प्रगणक (माहिती गोळा करणे) कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याच राष्ट्रीय मोहिमेच्या कामासाठी त्या बुधवारी सकाळी त्यांच्या दुचाकीवरून (क्रमांक: MH-14/ CV-8618) अहिरवडे गावाच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र, कान्हे फाटा ओलांडत असताना मागून येणाऱ्या एका वेगवान कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली, ज्यात त्यांचा जागीच जीव गेला.
ओळखपत्रावरून ओळख पटली; पोलिसांकडून तपास सुरू
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी करत असताना त्यांच्याकडे मिळालेल्या शासकीय ओळखपत्रामुळे त्यांची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी तातडीने मावळ तहसीलदार कार्यालय आणि शिक्षिका तांबे यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून या अपघाताची माहिती दिली. या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.


