इंदापूर : राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले अनंतराव थोपटे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. समाजाला दिशा देणारे, आदर्श मूल्ये जपणारे आणि जनतेच्या हितासाठी आयुष्य समर्पित करणारे हे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त करत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
लोकांशी जिव्हाळ्याचे नाते हेच थोपटे यांचे खरे वैशिष्ट्य
अनंतराव थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, थोपटे साहेबांनी आयुष्यभर मूल्याधिष्ठित राजकारण आणि समाजकारणाचा मार्ग स्वीकारला. भोर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सर्वसामान्य जनतेशी असलेला त्यांचा जिव्हाळा आणि लोककल्याणाची तळमळ यामुळेच ते जनतेच्या मनात कायमचे स्थान निर्माण करू शकले.
जुन्या आठवणींना उजाळा; युवा कार्यकर्त्यांना दिले मार्गदर्शन
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, त्यांचे काका दिवंगत नेते शंकररावजी पाटील (भाऊ) यांच्यासोबत अनंतराव थोपटे यांनी अनेक दशके जिल्हा आणि राज्याच्या विकासासाठी काम केले. पुणे जिल्हा सहकारी दूध संघ (कात्रज) चे संचालक असताना स्वतःसह अनेक युवा कार्यकर्त्यांना थोपटे साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि सामान्य माणसाशी कायम जोडलेली नाळ ही त्यांची ओळख होती, असेही त्यांनी नमूद केले.
विकासकामांचा समृद्ध वारसा आजही कायम
शिक्षण, परिवहन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून काम करताना अनंतराव थोपटे यांनी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले. त्यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विकासकामांचा ठसा आजही जनतेच्या स्मरणात कायम आहे. त्यांचा विकासाचा वारसा त्यांचे सुपुत्र आणि माजी आमदार संग्राम थोपटे पुढे नेत असल्याचे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी संग्राम थोपटे व त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
दुग्ध क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान
अनंतराव थोपटे यांनी राज्याचे दुग्धविकास मंत्री म्हणून कार्य करताना महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंदा) मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. राज्यात अतिरिक्त दूध उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी ‘दूध महापूर योजना’ प्रभावीपणे राबवली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यातील दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळाली आणि हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला. दुग्ध क्षेत्राच्या विकासातील त्यांचे योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल, असा गौरवपूर्ण उल्लेख हर्षवर्धन पाटील यांनी केला.


