Mumbai Sea Link tragedy: मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या ‘अटल सेतू’ या सागरी महामार्गावर रविवारी रात्री एक अतिशय चिंताजनक प्रकार समोर आला आहे. पुण्याचा रहिवासी असलेल्या एका तरुणाने या पुलावरून थेट समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अनपेक्षित प्रकारामुळे घटनास्थळावरील सुरक्षारक्षक आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
जेवणाचा बहाणा करून कारसह थेट गाठला सागरी पूल
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रतिक सुभाष रासकर (वय 28) असे समुद्रात उडी घेतलेल्या तरुणाचे नाव असून, तो पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचा मूळ रहिवासी आहे. शेअर मार्केटच्या क्लासेसशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या प्रतिकने रविवारी रात्री साधारण 1.29 वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवरून उडी मारली. उलवे पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या माहितीनुसार, घराबाहेर पडण्यापूर्वी तो ‘मी जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये जातो’ असे कुटुंबीयांना सांगून कार घेऊन निघाला होता. मात्र, त्यानंतर तो थेट अटल सेतूवर पोहोचला आणि तिथून त्याने समुद्रात झेप घेतली.
सीसीटीव्ही फुटेजवरून थरार उघड, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
प्रतिक रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे चिंतेत पडलेल्या त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार उलवे पोलीस ठाण्यात नोंदवली होती. नातेवाइकांनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला असता, अटल सेतूवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि तिथल्या सुरक्षारक्षकांच्या माहितीवरून प्रतिकने पुलावर कार उभी करून समुद्रात उडी घेतल्याचे स्पष्ट झाले. सध्या स्थानिक पोलीस आणि तटरक्षक दलाकडून समुद्रात आणि किनारी भागात व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे. मात्र, अद्याप त्याचा कोणताही सुगावा लागलेला नाही. या घटनेमुळे रासकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, प्रतिकबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने उलवे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


