नवी दिल्ली : देशभरातील सरकारी आणि खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांचा गणित विषय कच्चा असल्याची चिंताजनक बाब केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘परख’ सर्वेक्षणातून समोर आली आहे. इयत्ता तिसरीतील फक्त ५५ टक्के विद्यार्थ्यांना ९९ पर्यंतची उजळणी चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिता आली. तर इयत्ता सहावीतील फक्त ५३ टक्के विद्यार्थ्यांना १० पर्यंतचे पाढे पाठ असल्याचे वास्तव सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
समग्र विकासासाठी ज्ञानाचे मूल्यांकन, पुनरावलोकन आणि विश्लेषण (परख) राष्ट्रीय सर्वेक्षण गतवर्षी डिसेंबर महिन्यात करण्यात आले होते. सर्वेक्षणात देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ७८१ जिल्ह्यांतील ७४,२२९ सरकारी व खासगी शाळांमधील इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीच्या २१ लाख १५ हजार २२ विद्यार्थ्यांचा आढावा घेण्यात आला. सर्वेक्षणानुसार इयत्ता तिसरीतील फक्त ५५ टक्के विद्यार्थ्यांना ९९ पर्यंतचे अंक चढत्या व उतरत्या क्रमाने लिहिता आले. तर फक्त ५८ टक्के विद्यार्थ्यांना दोन आकडी बेरीज व वजाबाकी करता आली. इयत्ता सहावीतील फक्त ५३ टक्के विद्यार्थ्यांना अंकगणित क्रिया, त्यांच्यातील संबंध समजल्याचे आणि १० पर्यंतचे पाढे पाठ असल्याचे आढळले.
इयत्ता सहावीसाठी भाषा आणि गणितासोबत ‘आपल्या अवती-भोवतीचे जग’ हा अतिरिक्त विषय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर गणितात सर्वात कमी सरासरी ४६ टक्के, भाषा विषयात ५७टक्के आणि अतिरिक्त विषयात ४९ टक्के गुण मिळविले आहेत. एकंदरीत निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना अचूक उत्तर देता आले नाही. यावरून शिकवण्यातील उणिवा उघड झाल्या. या उणिवा दूर करण्यासाठी ठोस धोरणात्मक हस्तक्षेपाची आवश्यकता शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. इयत्ता नववीच्या श्रेणीत केंद्र सरकारच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सर्व विषयांत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
भाषा विषयात विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे बाजी मारली. तर खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि समाजशास्त्र विषयात चांगली कामगिरी केली; पण गणितामध्ये कमी गुण मिळवले. राज्य सरकार व सरकारी अनुदानावरील शाळांमध्येदेखील हीच स्थिती दिसून आली. ग्रामीण आणि शहरी फरक सर्वेक्षणातून अधोरेखित झाला. ग्रामीण भागातील इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी गणित आणि भाषा या दोन्ही विषयांत चांगली कामगिरी केली. तर शहरी भागातील इयत्ता सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये आपल्या ग्रामीण भागातील समकक्ष विद्यार्थ्यांच्या तुलनेत चांगले प्रदर्शन केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


