सोलापूर: राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बळीराम साठे यांच्याकडे असणारे शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद काढून घेतल्यामुळे नाराज असलेल्या बळीराम साठे समर्थकांच्या शिष्टमंडळाने मंगळवार १५ जुलै रोजी मुंबई येथील वाय. बी सेंटर येथे पक्षाचे संस्थापक खा. शरद पवार यांची भेट घेतली. याप्रसंगी खा. शरद पवार यांनी २० जुलै पासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. ते सुमारे तीन आठवडे चालेल. अधिवेशन संपल्यानंतर आपण स्वतः सोलापूरला येऊन जिल्हाध्यक्ष पदाचा तिढा सोडविणारा असल्याचा शब्द या शिष्टमंडळाला दिल्याचे समजते.
त्यामुळे बळीराम साठे यांचे नाराजी नाट्य मिटण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी जि.प. सदस्य संजय पाटील-घाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली खा. पवार यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात बाळासाहेब पाटील, प्रल्हाद काशीद, मनोज साठे, बंदेनवाज कोरबू, जितेंद्र शीलवंतु, नागेश पवार, शरद साठे यांचा समावेश होता.
मुंबई येथील वाय.बी सेंटर मध्ये झालेल्या खा. शरद पवार यांच्या भेटी प्रसंगी समाधानकारक चर्चा झाल्याचे शिष्टमंडळात समाविष्ट असणाऱ्या साठे समर्थकांनी सांगितले. या भेटी दरम्यान साठे समर्थकांनी खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार यांचीही भेट घेतल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे हे झाल्याने आपोआपच पक्षाची जुनी कार्यकारिणी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे लवकरच पक्षसंघटनेत फेरबदल होतील अशी अपेक्षा साठे समर्थकाना आहे.


