सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून सूर्यकांत भुजबळ यांची नियुक्ती झाली आहे. भुजबळ हे सध्या धाराशिव जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
भुजबळ यांची नियुक्ती झाली आहे. भुजबळ यांनी परिविक्षाधीन कालावधीत सोलापूर जिल्हा परिषदेत १६ नोव्हेंबर २०१४ ते ३१ ऑगस्ट २०१५ या कालावधीत काम केले आहे. त्याबरोबरच उत्तर सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे तात्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांची कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्या विशेष कार्य अधिकारी पदी निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी पद रिक्त होते. दरम्यान ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारीपदी गणेश मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसे आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून १८ जून २०२५ रोजी काढले होते. मात्र मोरे हे जिल्हा परिषदेत हजरच झाले नाहीत. त्यांच्या जागी आता भुजबळ यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


