Dharashiv: धाराशिवमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. धाराशिव परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे गंभीर नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि महापूरानंतर शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढल्याने म्हात्रेवाडी येथील 42 वर्षीय लक्ष्मण बाबासाहेब पवार यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. सोयाबीन आणि कांदा पिकांचे नुकसान झाल्याने पवार मानसिक ताणाखाली होते.
म्हात्रेवाडी परिसरात दोन दिवस जोरदार पाऊस पडल्याने शेतात पाणी साचले. तसेच शेतातील सर्व माती वाहून गेली. पिकांचे नुकसान इतके गंभीर झाले की, पुन्हा शेती करणे अशक्य झाले. या परिस्थितीमुळे लक्ष्मण पवार हे हवालदिल झाले आणि त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर ढासळला आहे.
हेही वाचा – Pune Crime: धक्कादायक! ससून रुग्णालयात मनोरुग्णाची 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
या घटनेनंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पवार कुटुंबाला भेट देऊन 1 लाख रुपयांची तातडीची मदत केली. त्यांच्या या पावलाने कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला, तरी राज्य सरकारकडून अजूनही कोणतीही ठोस मदत आलेली नाही. गावकऱ्यांनी सरकारकडे तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली असून, वेळेवर मदत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यातील जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. पावसाशी संबंधित घटनांमुळे मराठवाड्यात आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात लातूर 3, धाराशिव 1, बीड 2 आणि नांदेडमध्ये 1 जणांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, मराठवाड्यातील 150 हून अधिक जनावरे दगावली आहेत. संभाजीनगरमध्ये 5, जालना 15, परभणी 6, हिंगोली 6, नांदेड 9, बीड 63, लातूर 7 आणि धाराशिव 21 जनावरे गमावली गेली आहेत.


