Anjali Damania on Nitin Gadkari: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे. दमानिया यांनी दावा केला की, गडकरींनी टोलच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार केला असून, या रकमेतून त्यांच्याशी संबंधित कंपन्यांना लाभ मिळवून देण्यात आला. दमानिया यांनी म्हटलं आहे की, नागरिक रोड टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटी असे कर भरत असताना टोल आकारण्याची गरजच नाही. टोलमधून जमा झालेले कोट्यवधी रुपये ‘आयडीएल’ नावाच्या कंपनीकडे गेले आणि तिथून ते गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांकडे वळवण्यात आले, असा थेट आरोप दमानिया यांनी केला आहे.
प्रत्येक किलोमीटरमागे भ्रष्टाचाराचा आरोप
‘एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडकरींवर प्रत्येक किलोमीटर रस्त्याच्या कामामागे आणि टोल प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. सरकारच्या बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) आणि टोल-ऑपरेट-ट्रान्सफर (TOT) मॉडेल्सवरही त्यांनी जोरदार टीका केली.
हेही वाचा – ‘आता रोजगार हमीच्या कामावर जा…’; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना खोचक सल्ला
इथेनॉल व्यवसायातील कंपन्यांवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
दरम्यान, टोलप्रकरणाबरोबरच दमानिया यांनी इथेनॉल क्षेत्रातील गडकरींशी संबंधित कंपन्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या क्षेत्रात गडकरींशी जोडलेल्या तब्बल 128 कंपन्या कार्यरत आहेत आणि त्यांच्या तपशीलांचा उलगडा केल्यास मोठा घोटाळा उघड होईल. प्रत्येक मोठ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये या कंपन्या कशा सामील होतात, यावर त्यांनी संशय व्यक्त केला.
पदाचा गैरवापर केल्याचा आरोप
तथापी, दमानिया यांनी गडकरींच्या मुलांची थेट नावे घेतली नाहीत, मात्र दोन्ही मुलांच्या कंपन्या असा उल्लेख करत आरोप केला की, गडकरींनी मंत्रीपदाचा उपयोग स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी केला. ते देशसेवेसाठी मंत्री झाले होते, पण त्यांनी पदाचा गैरवापर करून मुलांच्या कंपन्यांना उभं केलं, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.


