जालना: राज्यातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर जोरदार चर्चा रंगली आहे. रायगडमधील एका कार्यक्रमात त्यांनी ‘रिकामं ठेवू नका… हाताला काहीतरी काम द्या’ असं म्हटलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु असल्याचा राजकीय अर्थ लावला जात आहे. मात्र, या वक्तव्यावर विरोधकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, ‘रोजगार हमीच्या कामावर जा, नाहीतर बाराशी खांदायला जा…’, असा खोचक सल्ला दिला आहे. तथापी, मनोज जरांगे यांनी मराठ्यांना त्रास झाला तर अजित दादाचा खेळ संपला, असा इशाराही दिला.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं की, ‘तो तसेच लोक कामाला लावतो, मग त्याला खेळायला माग रान मोकळं राहतं. तो फुकटात जातींचा उपयोग करून घेतो. तो गरीब जातींचा फुकटात उपयोग करून घेतो, त्याला भारी गेम जमतो बोलून लोक कामाला लावायचे, असा निशाणाही यावेळी जरांगे यांनी छगन भुजबळांवर साधला.
तथापी, मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, ओबीसीला सर्वात मोठा डाग असेल तर तो छगन भुजबळ आहे. सगळ्या ओबीसी आणि मराठ्यांचे त्याने वाटोळं केले, त्याला पापाची फेड करावी लागणार आहे. न्यायदेवता त्याच्यासाठी नाही, सर्वांसाठी आहे. जनता नाही जनार्दन नाही, तुकाराम नाही, ना एकनाथ नाही. तुझ्या डोक्यावर पापाचा हात आहे. त्यांचा पापाचा घडा भरला आहे. त्यांना अजून खूप भोगावं लागणार आहे, असा इशाराही जरांगे पाटीलांनी यावेळी दिला.
तथापी, भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या वक्तव्याबाबत बोलताना सांगितले की, ‘हाताला काम द्या’ या विषयावर ते आत्ताच काहीही बोलणार नाहीत. कारण त्यांच्या मतदारसंघात प्रचंड पूर आला आहे. मात्र, दोन दिवसानंतर सुरेश धस यांनी यावर खुमासदार उत्तर देण्याचे संकेत दिले. तथापी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, ‘धनंजय मुंडे यांना जनतेच्या कामापासून दूर ठेवावे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पक्षाची कामे त्यांनी करावी, पण जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत येऊ नये.’


