Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेले सरकारी ससून रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आज सकाळी रुग्णालयात दाखल असलेल्या एका मनोरुग्णाने 11 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव विजय असून, त्याच्या मृत्यूनंतर रुग्णालयाच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयला 5 सप्टेंबर रोजी रेल्वे पोलिसांनी उपचारासाठी ससूनमध्ये दाखल केले होते. यापूर्वी त्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून त्याला वाचवले आणि रुग्णालयाच्या मनोरुग्ण विभागात दाखल केले होते. तरीही रुग्णाने आज पुन्हा आत्महत्येचे पाऊल उचलल्याने रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा समोर आला आहे.
दरम्यान, बुधवारी ससून रुग्णालयावर आणखी एक गंभीर आरोप झाला होता. कातकरी समाजातील एका तरुणाला उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. रुग्णालयाच्या जमिनीवर तब्बल दोन तास वेदनेने तडफडून या तरुणाचा जीव गेला, अशी तक्रार कुटुंबीयांनी केली आहे. सतत उघड होत असलेल्या या घटनांमुळे ससून रुग्णालयाच्या व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी मनोरुग्णाच्या आत्महत्येचा तपास सुरू केला असून, त्यामागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.


