Mock Drill in Pune: पुणे शहरातून मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी दुपारी डेक्कन परिसरात मॉक ब्लास्ट ड्रिलमुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. वाहतूक शाखेने आधीच प्रेस नोटमध्ये गरवारे पुलाची दुरुस्ती आणि एम जी रोडवरील रस्ता बंद राहणार असल्याचे सांगितले, त्यामुळे नागरिकांनी त्या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते. प्रत्यक्षात मात्र, गरवारे पुलाची दुरुस्ती नाही, तर याठिकाणी पोलिसांची आपत्कालीन मॉक ड्रिल सुरू होती.
ड्रिलमुळे उडाला गोंधळ
ड्रिल दरम्यान, कर्वे रोडवर वाहतूक कोंडी झाली आणि अग्निशमन दलाची गाडी जवळपास 10 मिनिटे अडकली. डेक्कन व कॅम्प परिसरातील एम जी रोडवर वाहतूक बंद करण्यात आली होती. या बंदीच्या काळात, डेक्कन येथील मेट्रोच्या पादचारी पुलाजवळ दोन डमी ब्लास्ट केले गेले, ज्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. काही लोक बाजूच्या गल्लीत पळाले, तर पोलिस कमांडो ब्लास्टच्या ठिकाणी पोहोचले आणि मॉक ड्रिल पूर्ण केली.
हेही वाचा – Pune Crime : आधी बायकोचा खून, नंतर नवऱ्यानं स्वत:ला संपवलं, दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुणे हादरलं
पोलिसांचा खुलासा
पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी स्पष्ट केले की, हा पूर्णपणे डमी ब्लास्ट होता आणि पोलिसांचे एक सराव ड्रिल होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत काय करावे हे नागरिकांनी अनुभवावे, यासाठी ही मॉक ड्रिल करण्यात आली. रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊन नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून गरवारे पुल व एम जी रोडवर दुरुस्ती असल्याचे सांगण्यात आले होते, असेही त्यांनी नमूद केले. मॉक ब्लास्ट आणि वाहतूक बंदीमुळे नागरिकांमध्ये तणाव निर्माण झाला. ड्रिलमुळे कर्वे रोडवर गोंधळ, तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांचे उशिराने पोहोचणे या घटना घडल्या, पण त्वरित पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.


