पुणे : महावितरणकडून ग्राहकसेवांमध्ये आणखी सुविधा देण्यात येत आहे. त्याशिवाय, कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी स्वतंत्र पथकेतयार केली आहे. ज्यात देखभाल दुरुस्ती आणि बिलांच्या वसुलीची जबाबदारी वेगळ्या पथकाकडे असणार आहे. या पुर्नरचनेला प्रायोगिक तत्त्वावर बुधवारी (दि. १) प्रारंभ झाला. येत्या महिन्याभरात कामाकाजाचा आढावा घेऊन पुर्नरचनेचा मसूदा अंतिम करण्यात येईल व १ नोव्हेंबरपासून ही पुनर्रचना लागू करण्यात येईल.
देखभाल व दुरुस्ती उपविभागातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी वीजयंत्रणेची देखभाल व दुरूस्तीचे कामे, नवीन वीजयंत्रणा उभारणे, वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कामे करतील. तर महसूल व देयके उपविभागातील अभियंते, कर्मचारी नवीन वीजजोडणी, अचूक बिलींग, बिलिंग तक्रारींचे निवारण, थकबाकी वसूली ही कामे करणार आहेत.
देखभाल व दुरुस्ती पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व तांत्रिक कर्मचारी अशा १० जणांचा समावेश असेल. उपकेंद्र व वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम हे पथक करेल. प्रत्येक उपविभागात महसूल व देयके आणि देखभाल व दुरुस्ती अशी विभागणी करण्यात येईल. ग्राहकसेवेसाठी देखभाल व दुरुस्ती आणि महसूल व देयके अशी विभागणी करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये आणखी सुसूत्रता येणार आहे. त्यांच्यावरील कामांचा ताण कमी होणार असून ग्राहकांना अधिक तत्परतेने सेवा मिळेल. अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना सरसकट सर्वच कामे एकाचवेळी करण्याऐवजी आता अधिक केंद्रीत पद्धतीने निश्चित केलेली निवडक कामे करता येईल. कामाचे नियमानुसार तास निश्चित होतील व कामाचा ताण देखील कमी होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.
महावितरणमध्ये राज्यातील १६ परिमंडलांमध्ये १४७ विभाग, ६५२ उपविभाग व ३२७४ शाखा कार्यालय तसेच ४ हजार १८८ उपकेंद्रांमध्ये सुमारे ४४ हजार अभियंते व तांत्रिक कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपविभाग व शाखा कार्यालयांद्वारे नवीन वीजजोडणी, मासिक वीजबिल, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीज यंत्रणेची नियमित देखभाल, तांत्रिक बिघाडांची दुरुस्ती, वीजबिलांची थकबाकी वसूली, वीजहानी कमी करणे आदी कामे करण्यात येतात. त्यामुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी १० ते १२ प्रकारची कामे करावी लागत आहे. ही रचना सुमारे २५ वर्षांपूर्वीची आहे.
या पुनर्रचनेमधून सद्यस्थितीत कमी ग्राहकसंख्येच्या नंदुरबार, वाशीम, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांसह ३५ उपविभागांना या पुर्नरचेनमधून वगळण्यात आले आहे. तर सध्याच्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बीड, नांदेड, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांमध्ये पुनर्रचनेची अंमलबजावणी पूरग्रस्त वीज यंत्रणेची उभारणी झाल्यानंतर होणार आहे.


